AranyaLipee Logo
AranyaLipeeNature's Own Script
Wildlife • Maharashtra

ताडोबा राष्ट्रीय उद्यान
(ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प)

Published on 15 June 2026 • By AranyaLipee

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात वसलेले ताडोबा हे राज्यातील सर्वात जुने व सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. हे जंगल ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणूनही प्रसिद्ध आहे. घनदाट जंगल, समृद्ध जैवविविधता आणि वाघांच्या अधिवासामुळे हे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानले जाते.

Tadoba Main Gate

ताडोबा नावाची आख्यायिका

विदर्भातील या घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजामध्ये"तारू"हे एक दैवत मानले जाते.

असे म्हणतात की, एका आदिवासी गावाचा प्रमुख "तारू" याचा एका वाघासोबत भीषण संघर्ष झाला. या झुंजीमध्ये त्याने शौर्याने लढा दिला, परंतु त्याचा मृत्यू झाला.

Tadoba

तारूच्या बलिदानाच्या स्मरणार्थ आदिवासी गावकऱ्यांनी जंगलातील एका तलावाजवळ त्याचे मंदिर बांधले.

Tadoba

त्यानंतर हा परिसर "तारुबा" म्हणून ओळखला जाऊ लागला. पुढे "तारुबा" या शब्दाचा अपभ्रंश होत "ताडोबा" हे नाव रूढ झाले आणि आजही तेच नाव प्रचलित आहे.

Tadoba
अंधारी व्याघ्र प्रकल्प

या जंगलातून वाहणाऱ्या नदीचे नाव अंधारी असल्यामुळे या संरक्षित क्षेत्राला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प असे नाव देण्यात आले.

गोंड समाजाचे हे पारंपरिक जंगल जरी अत्यंत प्राचीन असले तरी या राष्ट्रीय उद्यानाची अधिकृत स्थापना सन १९५५ मध्ये झाली.

  • १९५५ – राष्ट्रीय उद्यानाची स्थापना
  • १९८६ – अभयारण्याचा दर्जा
  • १९९५ – व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषणा

आज ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांपैकी एक मानला जातो. येथे वाघांसोबत बिबट्या, अस्वल, रानकुत्रे, गवे, सांबर, चितळ तसेच शेकडो पक्षी प्रजाती आढळतात. त्यामुळे वन्यजीव प्रेमी, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी ताडोबा हे एक स्वर्गच आहे.